पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांतर्फे २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.
रोग निवारणाच्या या साधनेचा हा विशेष दिवस पालघर जिल्हा परिषदेमार्फत सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये योगाच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचविधी करणाऱ्या प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारी मुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता मतदान घेण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योगदिन व स्वच्छता मतदानाच्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सुरेखा थेतले यांनी नवली प्राथमिक शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. योगसाधनेचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करून आपल्या शाळेला, कुटुंबाला, जिल्ह्याला आणि देशाला विवध क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त करून द्यावा, अशा शुभेच्छा या वेळी अध्यक्षांनी विद्यार्थिनींना दिल्या. त्यांनी मुलांसोबत स्वतः योगासने केली व स्वच्छता मतदान प्रक्रियेची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या वेळी पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. एकला भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर योगाभ्यास केला. ‘योग केवळ व्यायाम नाही, तर मेंदू आणि शरीर यांना एकत्र जोडणारा दुवा आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यामधील सामंजस्य आहे,’ असे मत त्यांनी या वेळी मांडले.
या उपक्रमांतर्गत टी. ओ. चव्हाण (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद पालघर) यांनी खुपरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत योगदिन साजरा केला. तसेच ‘स्वच्छता मतदान’ उपक्रमाची पाहणी केली. या कार्यक्रमाला अश्विनी शेळके (सदस्या, पंचायत समिती, वाडा), श्री. जाधव (विस्तार अधिकारी - ग्रामपंचायत), शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ व ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवॠषी यांनी ‘दुर्वेश’ येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन योगदिन साजरा केला.
या वेळी जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी व पालघर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये योगसाधनेविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवॠषी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय पतंगे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोह) नंदिनी घानेकर, कार्यकारी अभियंता संजीव धुमाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व. बा.) राजेंद्र पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, गटविकास अधिकारी (पंचायत समिती पालघर) डी. वाय जाधव, विलास पिंपळे, गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना योग आणि आहारविषयक माहिती देऊन योगोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल मोरे यांनी मार्गदर्शन केले. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली.